File image of a liquor shop shut | (Photo Credits: PTI)
कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर राज्य सरकारने अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय सुद्धा घेतला. परंतु दारुची दुकाने सुरु करताच त्याबाहेर होणारी गर्दी पाहता महापालिकेने तो निर्णय पुन्हा मागे घेतला आहे. याच दरम्यान आता पश्चिम आणि पूर्व भागातील मुंबईकरांना लॉकडाउनच्या काळात दारु मिळत नसल्याने त्यांनी वसई-विरार-पालघरसह भिवंडी हायवेजवळ दारुची सोय होत असल्याने तेथे धाव घेतली आहे. त्यामुळे सध्या वसई-विरार-पालघर हे दारु मिळण्याचे नवे हॉटस्पॉट ठरले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारने दारुची दुकाने पुन्हा उघडण्याचा निर्णय हा सर्वोतोपरी महापालिकेवर अबलंबून असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने दारुची विक्री करण्यास परवानगी दिली आहहे. त्यामुळे मुंबईकर ठाण्यातील आपल्या मित्रांना त्यांच्यासाठी दारुची सोय करावी असे सांगत आहेत. आतापर्यंत बहुतांश जणांनी मुंबई येथून वसई, विरार आणि पालघरचा प्रवास करत दारुची सोय केली आहे. यावर आता मनिकापूर आणि वाळीव या वसई मधील पोलिसांकडून अशा नागरिकांची तपासणी करत आहेत.(मुंबई: उत्तर प्रदेशाला जाणाऱ्या 2 ट्रेन रद्द झाल्याने कांदिवली येथील महावीर नगर मध्ये स्थलांतरीत मजूरांची तोबा गर्दी; पाहा फोटोज)
एका व्यक्तीने पालघर येथून दारु विकत घेतली होती. मात्र तो व्यक्ती ठाणे येथे राहणारा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच वसईतील अंबाडी रोड येथे दारुची वाहतूक करणाऱ्या काही गाड्या ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या दारुची किंमत जवळजवळ 80 हजार रुपये असल्याचे ही पोलिसांनी सांगितले आहे. सातवली नाका, वाळीव आणि वसई फाटा येथे पोलिसांकडून दारु आणि गाड्या ताब्यात घेण्यात आली आहे. सात गाड्या आणि 1 लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आली असून या प्रकरणातील व्यक्तींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
(राज्यात काल एका दिवसात 5 हजार 434 ग्राहकांना घरपोच मद्य विक्री; नागपूर व लातूर येथील ग्राहकांनी मागवली सर्वात जास्त दारू)
बहुतांश गाड्या उत्तर आणि पश्चिम मुंबईतील असल्याचे मनिकापुर पोलिस स्थानकातील सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र कांबळे यांनी म्हटले आहे. पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी असे सांगितले आहे की, ज्या दारुच्या दुकानातून मुंबईकरांनी दारु खरेदी केली आहे त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्याचसोबत ठाण्यात सुद्धा काही दारु विक्री करणाऱ्या दुकानाच्या पाठच्या बाजूने नागरिकांना दारु पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. कासारवडवली येथील पोलिसांनी या प्रकरणी दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने दारु विक्री करताना पकडले आहे. ठाण्यात आतापर्यंत 10,200 जणांना दारुची होम डिलिव्हरी करण्यात आली आहे. तसेच 218 दारुची दुकाने ठाण्यात असल्याचे ही सांगण्यात आले आहे.