Exam Result| Pexel.com

SSC HSC Exam: आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती. मात्र, आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) ( Maharashtra State Board decision) जुलै ऑगस्ट 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या दृष्टीने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली आहे.

जुलै-ऑगस्ट परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्जाची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून (ता.15) सुरू होणार आहे. खासगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रत, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येईल. तसेच, पत्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असेही कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज्य मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांनी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. याबाबत मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या ‘http:/www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असूनही दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून यावर्षी प्रथम जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याकरिता नावनोंदणीची संधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.