एखाद्या बाबीची माहिती नसताना केलेले अघोरी धाडस कधीकधी जीवावरही बेतते. अशीच घटना वर्धा (Wardha News) जिल्ह्यात पाहायला मिळाली आहे. सापांच्या प्रजातीबद्दल कोणतीच माहिती नसताना प्रशांत उर्फ बबलू काकडे (वय 42 वर्षे रा. सानेवाडी) नावाच्या तरुणाने साप पकडण्याची चूक केली. त्यातही त्याने पकडलेला साप धामण (Dhaman Or Indian Rat Snake) प्रजातीचा असावा असे समजून पकडला. प्रत्यक्षात मात्र तो विषारी मण्यार (Common Krait Snake) प्रजातीचा साप होता. इथेच डाव त्याच्या अंगलट आला. धामण समजून त्याने पकडलेल्या मण्यार सापाने त्याला चावा घेतला. यात प्रशांत उर्फ बबलू याचे प्राण गेले.
बबलू काकडे याचा पेंटींगचा व्यवसाय होता. या व्यवसायातून तो आपली गुजराण करती असे. तो अविवाहीतही होता. गुरुवारी यासंकाळच्या वेळी त्याच्या घरात साप आढळून आला. त्याने तो पकडला. त्याला सापाबद्धल विशेष माहिती नव्हती. केवळ अतिधाडस इतक्याच माफक ज्ञानावर त्याने साप पकडला. आपण पकडलेला साप हा धामण प्रजातीचा असावा असा त्याचा समज होता. धामण हा विनविषारी साप असतो, अशी लोकचर्चा त्याला ठावूकही होती म्हणे. त्यातूनच त्याने तो साप पकडला. तो केवळ साप पकडूनच थांबला नाही. त्याने चक्क तो साप आपल्या पँटच्या खिशात घातला. (हेही वाचा, Snake Viral Video: सापासोबत मस्ती, महागात पडली, पाहा काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ)
बबलू उर्फ प्रशांत काकडे याचा हा प्रताप उपस्थित नागरिकही पाहात होते. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला. काही लोक त्याला सापाशी खेळू नको असा सतर्कतेचा इशाराही देत होते. परंतू, अतिधाडसाने पोकळ विरश्री अंगात शिरलेला बबलू कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर सापाने त्याला कडकडून चावा घेतला. स्थानिक नागरिकांनी त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. रात्री सुमारे 11.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.
साप हा निरुपद्रवी प्राणी आहे. शक्यतो तो कारणाशीवाय कोणालाही इजा करत नाही. परंतू, जर घर अथवा परिसरात कोणाला साप आढळून आल्यास नागरिकांनी याची कल्पना तातडीने सर्पमित्रांना अथवा वन अधिकाऱ्यांना द्यावी. जेणेकरुन सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे सहज शक्य होईल. अन्यथा अतिधाडसाने साप पकडणे हे अनेकदा जीवावर बेतू शकते, असा सल्ला सर्पमित्र देतात.