मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी Rashmi Thackeray यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल
Rashmi Thackeray (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर (Offensive Post on Facebook) टाकण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील (Pune) एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हा मजकूर 7 मे रोजी सायंकाळच्या सुमारास टाकण्यात आला होता. त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर लगेच विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) तक्रार देण्यात आली होती. ही पोस्ट फेसबूकवरून हटवण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे (वय 52) असे आरोपीचे नाव आहे. काकडे हे वडगाव शिंदे हवेली येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, वाडगाव शिंदे येथील राजेंद्र शिंदे नावाच्या एका व्यक्तीने 7 मे रोजी सायंकाळच्या सुमारास रश्मी ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोहगाव येथील आनंद गोयल यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, राजेंद्र पंढरीनाथ काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा- Money Laundering Case: CBI पाठोपाठ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या विरोधात ED कडूनही गुन्हा दाखल

दरम्यान, 6 मे रोजी उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही सोशल मीडियावर बदमानीकारक आणि अश्लील मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आकाश शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.