मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दक्ष झाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) आणि राज्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्यातही एक बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, असे अवाहन पोलीस महासंचालकांनी केले. तसेच, कोणी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. यात बाळा नांदगावकर यांच्यासह, नितीन सरदेसाई यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही मनसे नेत्यांना तर आपल्या शहरातून काही काळ बाहेर जाण्यासही सांगण्यात आल्याचे समजते. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या आधारे 4 मे नंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिक सक्रीय झाले आहेत. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray on Raj Thackeray: भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका)
महासंचालक रजनी सेठ यांनी पत्रकार परिषदे माहिती देताना सांगितले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गृहमंत्र्यांनी एक बैठक घेतली. कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यात आणि नियंत्रणात ठेवण्यास पोलीस सक्षम आहे. संभाव्य स्थितीचा विचार करुन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या समाजकंटक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर आम्ही आगोदरच प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचेही सेठ यांनी या वेळी सांगितले.