कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव (संग्रहित प्रतिमा)

पोटनिवडणुकांच्या निकालांतील भाजपच्या पराभवाची मालिका मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरूच आहे. मागे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या पोटनिवडणुकांत जे घडले, तेच आता कर्नाटकातही घडले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात जो सपाटून मार खावा लागला, तो भाजपसाठी तर धक्कादायक आहेच, पण त्याहीपेक्षा काँग्रेसच्या निप्राण देहात प्राण फुंकणारा हा निकाल आहे. झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत बालेकिल्ल्यातच पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भाजपला नाकच राहिले नाही, अशी कोपरखळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षाला लगावली आहे.

कर्नाटकातील लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या 5 जागांपैकी केवळ एकच जागा भाजपने कशीबशी जिंकली. अन्य चारही जागांवर काँग्रेस व जेडीएसचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. मतविभाजन हाच भाजपच्या विजयाचा मूळ आधार आहे आणि तेच होऊ द्यायचे नाही, याची पक्की खूणगाठ आता भाजपविरोधी पक्षांनी बांधलेली दिसते. त्यामुळेच उत्तर प्रदेशात जसे सपा आणि बसपाने एकत्र येऊन पोटनिवडणुकांत भाजपला अस्मान दाखवले, तोच प्रयोग आता कर्नाटकातही काँग्रेस आणि जेडीएसने यशस्वी करून दाखवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात जो सपाटून मार खावा लागला, तो भाजपसाठी तर धक्कादायक आहेच, पण त्याहीपेक्षा काँग्रेसच्या निप्राण देहात प्राण फुंकणारा हा निकाल आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बेल्लारी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार व्ही.एस. उगरप्पा 2 लाख 43 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. भाजपचे मातब्बर नेते श्रीरामुलू यांची बहीण जे. शांता यांचा येथे मानहानीकारक पराभव झाला. बेल्लारी म्हणजे कर्नाटक भाजपचे नाक मानले जाते. गेली 14 वर्षे ही जागा भाजपच्या ताब्यात होती. मात्र, हे नाकच आज भाजपकडे राहिले नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. (हेही वचाा, भाजपला धक्का, काँग्रेस, जेडीएस बहुमताने विजयी)

दरम्यान, 2014 साली मिळालेला जनाधार आता किमान 50 वर्षे तरी सरकणार नाही, अशी छातीठोक खात्री देणाऱ्यांनाही चार वर्षांतच घसरणीला लागलेल्या जनाधाराने चिंतेत टाकले आहे. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देश काँग्रेसमुक्त करण्याचा नारा दिला होता आणि देशवासीयांना ‘अच्छे दिन’ येतील, अशी ग्वाही दिली होती. मात्र, काँग्रेसमुक्त हिंदुस्थानच्या घोषणेला चार वर्षांतच घरघर लागली. देशातील सर्वसामान्य जनता ‘अच्छे दिन’च्या शोधात असली, तरी पोटनिवडणुकांच्या निकालांतून मात्र काँग्रेसचेच ‘अच्छे दिन’ परतून येत असल्याचे सूचक चिन्ह डोकावताना दिसते आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.