संपूर्ण जगामध्ये मुंबईच्या (Mumbai) बाबतीत ज्या काही गोष्टी लोकप्रिय आहेत, त्यामध्ये एक महत्वाचे नाव आहे ते म्हणजे मुंबईचे डबेवाले (Mumbai Dabbawala). संपूर्ण शहरात डबे पुरवण्याचे काम हे डबेवाले करतात. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्यामुळे आज जगाच्या पाठीवर त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र मुंबईमधीलच काही शाळांमध्ये या डबेवाल्यांना बंदी घातली आहे. दक्षिण मुंबईमधील काही कॉन्व्हेंट शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे डबे खाण्यास मनाई केली आहे.
शाळेतील कॅन्टीनमधील पदार्थ खाऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडू नये म्हणून, सरकारने शाळेतील जंक फूडवर बंदी घातली. त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी हे डबेवाले मधल्या सुट्टीमध्ये डबे पुरवण्याचे काम करीत होते. मात्र अचानक या डबेवाल्यांवर शाळांनी बंदी घातली आहे. याबाबत कोणतेही कारण दिले गेले नाही. निर्बंध का घालण्यात आले आहेत? आणि ही बंदी हटवावी अशी मागणी मुंबई डबा असोशिएशनने केली आहे. (हेही वाचा: प्रिन्स चार्ल्स आजोबा झाल्याच्या आनंदात मुंबई डब्बेवालेही सहभागी)
शाळेतील कॅण्टीनवाल्यांचा धंदा व्हावा यासाठी, पालकांनी या डबेवाल्यांतर्फे पुरवलेल्या डब्यांवर बंदी घातली. मात्र ज्या पालकांना डबेवाल्यांच्या मार्फत आपल्या मुलांना डबे पोहचवायचे आहेत त्यांना ते पोहचू द्यावेत, असे डबावाला संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिण्यात आले आहे. दरम्यान नुकतेच प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि मेघन मार्कल (Meghan Markle) या दांपत्याला पुत्रप्राप्ती झाली या आनंदात डबेवाले संघटनेन बाळासाठी सोन्या चांदीचे दागिने आणि शुभेच्छा लंडनला पाठवल्या आहेत.