Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नुकतेच मुंबईच्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसचा भीषण आपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 43 जण जखमी झाले. आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Old Mumbai-Pune Highway) बारवई (Barwai) गावाजवळ अजून एका बासचा अपघात झाला आहे. बारवई गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन करून घरी परतणाऱ्या एका भाविक (वारकरी) महिलेला भरधाव वेगाने येणाऱ्या एनएमएमटी (NMMT) बसने धडक दिली, परिणामी तिचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असलेल्या एनएमएमटी बस चालकाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

अहवालानुसार, यमुना पदू पवार (70) असे मृत महिलेचे नाव असून त्या पनवेलमधील मोटे भिंगार गावातील रहिवासी आहे. कीर्तनांना हजेरी लावण्यासाठी त्या वारंवार जवळच्या गावांमध्ये जात असत. बुधवारी, 11 डिसेंबर रोजी एकादशी असल्याने पवार सकाळी 9 वाजता त्यांच्या गावातील इतर महिलांसोबत बारवई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तनासाठी गेल्या होत्या. दुपारी कीर्तन संपल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास त्या घरी परतीच्या मार्गावर होत्या.

बारवई गावाजवळ मुंबई-पुणे महामार्ग ओलांडत असताना त्यांना भरधाव वेगात असलेल्या एनएमएमटी बसने धडक दिली. यामध्ये यमुनाबाई गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी एनएमएमटी बसचालक संभाजी नागे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. (हेही वाचा: Kurla BEST Bus Accident: कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, कुर्ल्यात बेस्ट बसला झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर एनएमएमटी आणि वाहतूक पोलिसांकडून चालकांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूसकर म्हणाले की, एनएमएमटी कोणत्याही नवीन ड्रायव्हरला काम सोपवण्यापूर्वी, ड्रायव्हरला 15 दिवसांचे कठोर प्रशिक्षण दिले जाते.