Nitesh Rane Bail Application: नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू, सिंधुदुर्गात वातावरण तापले
नितेश राणे (Photo Credits: Facebook)

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) अटक होण्याच्या भीतीने नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात (Sindhudurg District Court) धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरु झाली आहे. आता न्यायालयात नितेश राणेंना दिलासा मिळतो काय हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नितेश राणेंना अटक होण्याच्या शक्यतेने सिंधुदुर्गात वातावरण तापले असून, जिल्हाभरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच या घटनेतील फिर्यादी संतोष परब हेदेखील जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pande), अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल (Additional DGP Sanjiv Kumar Singhal), कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते (IG Sanjay Mohite) यांच्यासह कोकण विभागातील पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून आहेत.

नितेशवर खोटे गुन्हे दाखल - नारायण राणें

गुन्हा दाखल झाल्यापासुन नितेश राणे कुठे आहेत या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलं नाही आहे. तसेच  त्यांचा ठावठिकाणा सांगण्यास नारायण राणेंनीही नकार दिला. काल नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीत परतलेल्या नारायण राणेंनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी नितेश राणेंवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, आणि त्यासाठी सत्तेचा गैरवापर होतोय, असा आरोप राणेंनी केलाय. तसेच राज्यभरातून मोठा पोलीस बंदोबस्त कणकवलीत पोहोचलाय त्यावरूनही राणेंनी टीका केली आहे. (हे ही वाचा BJP आमदार Nitesh Rane यांच्या निलंबनाची मागणी; मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जाताना दिल्या होत्या 'म्याव, म्याव' घोषणा.)

काय आहे प्रकरण

संतोष परब यांच्यावर 18 डिंसेबरला कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.