Nitesh Rane | (Photo Credits: Twitter)

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासोबत अनुचित वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गेल्या आठवड्यात राणे विधानभवन संकुलात बसले असताना ठाकरे यांना इमारतीत जाताना पाहून राणे यांनी ‘म्याव' असा आवाज काढला होता, असा आरोप त्यांनी केला.

राजकारण्यांविरुद्ध असभ्य वर्तन होऊ द्यायचे नाही, यावर सर्व सदस्यांचे एकमत असल्याचे कांदे म्हणाले. मात्र राणे यांनी आपल्या वागणुकीचे समर्थन करत यापुढेही असेच वागणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. कांदे म्हणाले, ‘आदित्य ठाकरे हे एक आदरणीय व्यक्ती असून त्यांनी नितेश राणेंकडे लक्ष दिले नाही. मात्र आमच्या नेत्याचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही.’ राणेंनी सभागृहात माफी मागावी अन्यथा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी कांदे यांनी केली. (हेही वाचा: आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीस राज्यपालांचा नकार, महाविकासआघाडी सरकारला धक्का)

शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी कांदे यांना पाठिंबा दिला. राणे यांचे विधानसभेच्या सदस्यत्वावरून कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे, अशी मागणी पक्षाचे दुसरे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केली. शिवसेनेच्या सदस्यांनी केलेली घोषणाबाजी आणि गदारोळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. विशेष म्हणजे नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश यांना त्यांच्या वागणुकीबद्दल फटकारले जाईल, असे सांगितले. ‘परंतु सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेसाठी सदस्याला निलंबित करणे योग्य नाही,’ असेही ते म्हणाले

यावेळी, सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेची विधानसभेत चर्चा का होत आहे? असा प्रश्न भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मंगळवारी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितले.