ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग अधिक वाढू नये यासाठी राज्यातील महापालिकेच्या हद्दीत रात्रीची संचारबदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. तसंच कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व पालिका हद्दीत कालपासून संचारबंदी लागू केली असताना पुण्यातील ग्रामीण भागातही नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आज घेणार आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दल अधिकाऱ्यांची बैठक आज होणार आहे. या बैठकीत कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन संचारबंदीचा निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, सध्या पुण्याच्या ग्रामीण भागात नाईट कर्फ्यू नाही. आज होणाऱ्या कृती दल अधिकाऱ्यांच्या बैठकीत सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत नाईट कर्फ्यू लागू झाला असून 5 जानेवारीपर्यंत तो सुरु राहणार आहे. या काळात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. तसंच संचारबंदीच्या नियमांचे नीट पालन होण्यासाठी चोख पोलिस व्यवस्था ठेवण्यात आली आहे. (महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्र कर्फ्यू लागू; राज्य सरकारचा मोठा निर्णय)
कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर Europe आणि Middle East मधून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. (मुंबई विमानतळावर Europe आणि Middle East मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी BMC कडून क्वारंटाइन संदर्भात नव्या गाइलाइन्स जाहीर)
राज्यात कालच्या दिवसांत 3106 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 4122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 58376 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 1794080 रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट 94.3% इतका आहे.