Night Curfew in Maharashtra: महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्र कर्फ्यू लागू; राज्य सरकारचा मोठा निर्णय
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या सुरूवातीच्या काळात महाराष्ट्र आणि दिल्ली ही सर्वाधिक प्रभावित राज्ये होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राने अतिशय उत्तमरीत्या परिस्थिती हाताळून या संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आणले. आता ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या (New Year) स्वागताच्या उत्सवादरम्यान कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. म्हणूनच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त, युरोप आणि मध्यपूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांचा संस्थात्मक क्वारंटाईन (Institutional Quarantine) अनिवार्य करण्यात आला आहे. यासह मुंबईतील लोकांना 15 दिवसांहून अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली.  यावेळी गणेशोत्सव, दिवाळी या सणांच्यासारखेच ख्रिसमस आणि न्यू इयरबद्दल काही महत्वाचे निर्णय घेत, 5 जानेवारी पर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्रीचा कर्फ्यू जारी करण्यात आला.

ब्रिटन मध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. (हेही वाचा: Mumbai Police: मुंबई सायबर पोलिसांकडून Whatsapp वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा; वाचा सविस्तर)

युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशाप्रकारे राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले असून, नवनवीन उपयोजना राबवण्यात येत आहेत.