प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर वाढत चालला आहे. जनता कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने हा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. याआधी, राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील 8 दिवसांत जनतेने करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता औरंगाबाद (Aurangabad) शहरात रात्रीची संचारबंदी (Night Curfew) घोषित करण्यात आली आहे. प्रशासनाने आज रात्रीपासून शहरात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या कालावधीत याची अंमलबजावणी होणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी तसे आदेश दिले.

आज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्यामधून जीवनावश्यक वस्तू, त्यासंबंधीचे उद्योग आणि अशा कर्मचाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे. कर्फ्यूनंतर साप्ताहिक बाजार आणि दररोजचा भाजीपाला मार्केट चालू ठेवावे की नाही यासंबंधीचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. याआधी, सातारा, अमरावती, पुणे, वाशीम, नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमध्ये रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (हेही वाचा: Shirdi Sai Baba Temple: शिर्डी साई संस्थानचा मोठा निर्णय! 'या' अटींचे पालन न करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही)

सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात 132 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 48,770 झाली आहे. यामध्ये 1,255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 941 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, रविवारी, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित केले. राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे ते म्हणाले.