प्रातिनिधिक प्रतिमा

मुंबई पोलिसांवर गोळीबार घडल्याची एक गंभीर घटना घडली आहे. भायखळा परिसरात 7 नायजेरियन ड्रग्ज माफियांनी हा गोळीबार केला आहे. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच या गोळीबारावर नियंत्रण मिळवत, या टोळीचा पाठलाग करत या लोकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या लोकांची कसून चौकशी चालू आहे. या टोळीकडून 20 लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. परदेशी नागरिकांकडून अशा प्रकारे पोलिसांवर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे.

भायखळा परिसरात झोन क्रमांक 3 मध्ये पोलिसांनी दुपारी 3 च्या सुमारास या टोळीला पहिले. पोलिसांनी जेव्हा या टोळीची चौकशी सुरु केली तेव्हा, घाबरून या लोकांनी पळ काढला. पोलिसांनी जेव्हा या टोळीचा पाठलाग सुरु केला तेव्हा या लोकांनी पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली. पोलिसांनीही उत्तरादाखल गोळीबार सुरु केला. (हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 8 महिन्यात 11 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन)

या टोळीकडून 20 लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. तसेच एक रिव्हालवर आणि 4 जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले. गोळीबारात 3 ते 4 पोलीस जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या लोकांकडून बंदुका नक्की कुठून आल्या या गोष्टीची चौकशी सुरु आहे. या टोळीच्या विरोधात अवैधशस्त्र आणि अमली पदार्थ वापरण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.