मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

महाराष्ट्रात व्हिआयपींना (VIP) मिळणारी स्पेशल ट्रिटमेंट माहितीच्या अधिकारामुळे (Right to Information) उघड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) यांच्या वाहनांनी यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या काळात 11 वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी त्यांचे ई चलन रद्द केले आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना 13,000 रुपये दंड भरावा लागेल. मुंबईस्थित कार्यकर्ते शकील अहमद यांनी यासंदर्भातील आरटीआय (RTI) दाखल केला आहे.

सुरक्षेच्या प्रोटोकॉलमुळे मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला मुभा देण्यात आली होती, असे वाहतुक पोलिसांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या आरटीआयला उत्तर देताना वाहतूक पोलिसांनी सांगितले की, मुख्यमंत्री वापरत असलेल्या अधिकृत वाहनांपैकी एकाच गाडीने पाच वेळा नियमांचे उल्लंघन केले आहे तर इतर कार्सने 12 जानेवारी ते 12 ऑगस्ट दरम्यान 8 वेळा नियमांचे उल्लंघन केले आहे.

ट्रॅफिक चलन हे स्पीड कॅमेराद्वारे स्वयं-निर्मित (auto-generated) केले जाते. सुरक्षेच्या प्रोटोकॉलमुळे मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना वेग मर्यादेपासून मुक्त केले जाते," असे मुंबई वाहतूक पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. यात असेही म्हटले आहे की, ई-चलन तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी असून त्यात सुधारणा केली जात आहे. त्याचबरोबर बांद्रा वरळी सेलिंकमध्ये ट्रॅफिक इनफोर्समेन्ट कॅमेरे (traffic enforcement cameras) बसविण्यात आले आहेत.