महाराष्ट्रात (Maharashtra) ओसरलेली संख्या पुन्हा नव्या कोरोना (Coronavirus) लाटेच्या स्वरूपात येण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, राज्यातील विविध शहरांमध्ये खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध कडक करण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने मुंबईतील प्रदेश कार्यालयात दर आठवड्यात आयोजित मंत्रीमहोदयांचा 'जनता दरबार' (Janata Darbar) उपक्रम पुढील दोन आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले आहे की, शरद पवार यांच्या सुचनेनुसार जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबार हा उपक्रम राबविण्यात येतो. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व मंत्री महोदय या उपक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. मात्र, सध्या राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील दोन आठवडे जनता दरबार उपक्रम स्थगित करण्यात येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता! मुंबईपाठोपाठ नागपूरमध्येही कोव्हिड-19 च्या नियमाचे निर्बंध कडक
अनिल देशमुख यांचे ट्विट-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील प्रदेश कार्यालयात दर आठवड्यात आयोजित मंत्रीमहोदयांचा " जनता दरबार" उपक्रम पुढील दोन आठवडे स्थगित करण्यात आला आहे. कृपया, जनतेने याची नोंद घ्यावी, ही नम्र विनंती!@NCPspeaks pic.twitter.com/0sqX6g4H4a
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 19, 2021
तसेच राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व नियमांची काचेकोरपणे अंमलबजावणी करावी, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टिंगचे पालन करावे. तसेच मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन आणि गर्दी टाळावी. कोरोनावर मात करण्यासाठी आतापर्यंत आपण एकत्रितपणे लढा दिला असून रुग्ण संख्या नियंत्रणांत आणण्यात आपल्याला यश आले आहे. यापुढेही आपल्या सर्वांचे या लढण्यात सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन राष्ट्रवादी नेते जयंतराव पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे, जनतेची व कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या काही समस्या अथवा प्रश्न असतील तर, याबाबतचे संपूर्ण निवदेन संबंधीत ncpjantadarbar@gmail.com या ई-मेल आय.डी वर पाठवण्यात यावे, अशीही माहिती देण्यात आली आहे.