महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या अटोक्यात येत असल्याचे चिन्ह निर्माण झाली असताना नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. यात मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूरसह (Nagpur) विदर्भातील काही शहरांचा समावेश आहे. यामुळे प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई पाठोपाठ नागपूर महापालिकेनेही कोव्हिड-19 च्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.
नागपूर येथे गुरुवारी (18 फेब्रुवारी) कोविड-19चे 644 नवे रुग्ण सापडले होते. नागपुरात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 41 हजारपर्यंत पोहचली आहे. यातच नागपूर महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, यापुढे होम क्वारंटाईन रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यास सुरुवात होणार आहे. तसेच एका इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे. एवढेच नव्हेतर, अंत्यसंस्कार विधीला 20हून अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. याशिवाय, हॉटेल्सदेखील केवळ 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: अमरावती, यवतमाळ, सातारा, पुणे मध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही – आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
महाराष्ट्रात गुरुवारी 5 हजार 427 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर, 2 हजार 543 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 87 हजार 804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात एकूण 40 हजार 858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
राज्यात तब्बल 75 दिवसानंतर कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. गुरुवारी एकाच दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार का? अशी भिती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.