Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुन्हा कोरोना वायरसचा प्रसार झपाट्याने होण्यास सुरूवात झाली आहे त्यामुळे प्रशासन देखील आता अलर्ट मोड वर आले आहे. दरम्यान वर्धा, अमरावती, यवतमाळ येथे कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या पाहून काहींनी या भागात परदेशी कोरोना वायरसचा स्ट्रेन घुसल्याचा बातम्या प्रसारित केल्या होत्या मात्र आज शासनाच्या आरोग्य विभागाकडून या वर खुलासा करताना अमरावती(Amravati), यवतमाळ (Yavatmal), सातारा (Satara) आणि पुणे (Pune) अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत असली तरीही या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन (UK), दक्षिण आफ्रिका (South Africa) किंवा ब्राझील (Brazil) या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.असं स्पष्ट केले आहे. सारे विषाणू हे  A2 type of coronavirus आहेत जे मागील वर्षभरापासून भारतामध्ये धुमाकूळ घालत आहेत. Curfew in Akola: अकोला जिल्ह्यात संचारबंदीचा बडगा, रविवारी संपूर्ण दिवस इतर वेळी नागरिकांसाठी रात्रीचा संचार बंद.

दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये झपाट्याने वाढणारी कोरोना रूग्णसंख्या यामागील कारण शोधण्याचं काम सुरू असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी 4 नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणी अहवालामध्ये कोरोना वायरस हा परदेशी स्ट्रेन नसल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत.अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. असे देखील सांगण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये पुढील नोटीस येईपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश.

महाराष्ट्रामध्ये सध्या कोविड 19 लसीकरण मोहिम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे यांना लस देण्याचं काम सुरू आहे. देशात महाराष्ट्र हा लसीकरणामध्ये दुसर्‍या स्थानी आहे आता लसीचा दुसरा डोस देण्याचंदेखील काम काही ठिकाणी सुरू झाली आहे. पण लस आली म्हणून हलगर्जी पणा किंबा अनलॉक मधील बेफिकीर पणा नागरिकांना भोवताना दिसत आहे. सध्या अमरावती, वर्धा मध्ये काही प्रमाणात नियम पुन्हा कडक करण्यात आले आहेत. शाळा- कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. अद्याप कोठेही पूर्ण कडक लॉकडाऊन जाहीर झालेला नाही परंतू काही अंशी नियम कडक करण्यात आले आहेत.