वर्धा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये पुढील नोटीस येईपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची स्थिती हळूहळू बिकट होत चालली असल्याचे चित्र समोर येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने कोरोना बाधितांच्या संख्येत (Coronavirus Cases) वाढ होत आहे. दरम्यान वर्ध्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने जिल्हाधिका-यांनी पुढील आदेश येईपर्यंत वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये (Schools And Colleges) बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. राज्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली स्थिती पुन्हा बिघडू नये यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे.

वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 11,726 वर पोहोचली असून एकूण 301 रुग्ण दगावले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 10,959 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला वर्धा जिल्ह्यात 451 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.हेदेखील वाचा- Coronavirus Cases in Maharashtra: मागील 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत महिन्याभरातील सर्वात मोठी वाढ

दरम्यान राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची संख्या जर अशीच वाढत राहिली तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात काल (18 फेब्रुवारी) 5,427 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या (COVID-19 Cases in Maharashtra) 20 लाख 81 हजार 520 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 51 हजार 669 कोरोना रुग्णांचा मृत्यू (COVID-19 Death Cases) झाला आहे.