Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यात मागील 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही महिन्याभरातील सर्वात मोठी वाढ आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत महाराष्ट्रात 5,427 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या (COVID-19 Cases in Maharashtra) 20 लाख 81 हजार 520 वर पोहोचली आहे. तसेच मागील 24 तासांत 38 रुग्ण दगावले असून आतापर्यंत एकूण 51 हजार 669 कोरोना रुग्णांचा मृत्यू (COVID-19 Death Cases) झाला आहे.

दरम्यान गेल्या 24 तासांत 2543 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 19 लाख 87 हजार 804 रुग्णांनी (COVID-19 Recovered Cases) कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 40,858 कोरोना (COVID-19 Active Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहेत.हेदेखील वाचा- BMC New Covid-19 Guidelines: मुंबईत एखाद्या इमारतीत 5 हून अधिक कोविड रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डींग सील होणार- आयुक्त इक्बाल चहल

मुंबईत आज 736 नवे कोविड-19 रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,16,487 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 11,430 वर पोहोचला आहे. सद्य घडीला मुंबईत 6201 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील ही परिस्थिती लक्षात घेता शहरात मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार इमारतीत 5 हून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डिंग सील केली जाणार आहे.