NCP Dispute: शरद पवार गटाकडून पक्षासाठी तीन नावे निवडणूक आयोगास सादर, कोणत्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
Sharad Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? (NCP Dispute) या वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला आहे. तत्पूर्वी शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) निवडणूक आयोगाकडे तात्पूरत्या स्वरुपात मान्यतेसाठी तीन नावे निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) सादर केली आहेत. या तिनपैकी कोणत्या नावावर केंद्रीय निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करतो याबाबत आज सायंकाळी सात वाजेपर्यंत निर्णय अपेक्षीत आहे. दरम्यान, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यावरुन सर्वोच्च न्यायालयातील लढाई सुरुच राहणार असली तरी, तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळाले आहे.

शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षनावासाठी दिलेले तीन पर्याय

पर्याय क्रमांक 1) नशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरद पवार

पर्याय क्रमांक 2) नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार

पर्याय क्रमांक 3) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी -एस

निवडणूक आयोग कोणत्या नावावर करणार शिक्कामोर्तब?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? या वादात शरद पवार विरुद्ध अजित पवार वादात अजित पवार यांच्याबाजूने काल (6 फेब्रुवारी) आपला निर्णय दिला. हा निर्णय देताना शरद पवार गटाचा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार कायम ठेवला. तसेच, या गटाला स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता हवी असेल तर उद्या (7 फेब्रुवारी) दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्या पर्यायी नावांची यादी आयोगाकडे सादर करण्याचे अट ठेवली. तसेच, ही नावे वेळत सादर झाली नाहीत तर या गटाला अपक्ष म्हणून मान्यता दिली जाईल, असेही आयोगाने सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने आपल्या नावांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. (हेही वाचा, Ajit Pawar Real NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय; शरद पवार यांना धक्का)

'शरद पवार हाच पक्ष आणि चिन्ह'

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो. मात्र, या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येताच शरद पवार गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. देशामध्ये सध्या हुकुमशाही सुरु आहे. जाणीवपूर्व केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांचा आवाज संपवला जातो आहे. ज्या ठिकाणी विरोधकांचा आवाज संपत नाही तिथे थेट पक्षच संपविण्याचा डाव रचला जातो आहे, अशी भावना शरद पवार गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात अले असले तरी, शरद पवार हाच आमचा पक्ष आणि तेच आमचे चिन्ह आहे, अशी भावनाही या गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे.