पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार पुणे येथे क्रिकेट खेळताना (Photo: YouTube)

Sharad Pawar play cricket with Prithviraj: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणाप्रमाणेच क्रिकेटचेही मैदान नवे नाही. तसेच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही ही दोन्ही मैदाने तशी नवी नाहीत. पण, नवे आहे ते दोघांचेही क्रिकेट मैदानावर एकत्र येणे आणि चक्क क्रिकेट खेळणे. होय, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेते कार्यकर्त्यांप्रमाणेच अनेक पुणेकरांनीही हा क्षण अनुभवला. क्रिकेटच्या मैदानावर शरद पवार यांनी गोलंदाजी (बॉलिंग) तर, पृथ्वीराज चव्हाण यांनी फलंदाजी(बॅटींग). गंमत अशी की, पवारांनी टाकलेल्य एकाही चेंडूवर चव्हाणांना फटका मारता आला नाही. तर, या वेळी पवार यांनी बँटींग करणे टाळत राजकारणातल्या डावाप्रमाणे गुगली टाकली.

निमित्त होते, पुणे येथील तळजाई टेकडी येथील सदू शिंदे खुल्या स्टेडीयमच्या उद्घाटनाचे. या स्टेडीयमचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी मंडळी उपस्थित होती. उद्घाटन कार्यक्रम संपन्न होताच दोन्ही नेत्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. लागलीच दोन्ही नेते मैदानात आले. शरद पवार हे गोलंदाज तर, पृथ्वीराज चव्हाण फलंदाज म्हणून मैदानात उतरले. (हेही वाचा, दोनदा नेम हुकल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फुलटॉस बॉलवर शॉट मारला, तोही उजवीकडून डावीकडे)

डाव सुरु झाला. पवारांनी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. काही काळ गेला. काही चेंडूही टाकून झाले. पण, पवारांच्या चेंडूवर एकही फटका मारणे चव्हाणांना काही जमलेच नाही. अखेर, पृथ्वीराज चव्हाण यांनी आता आपण आपल्या भूमिका बदलूया म्हणत चेंडू हातात घेत पवारांकडे बॅट दिली. पण, पवार यांनी फलंदाजी करणे टाळले. शरद पवार यांची ही मिश्कील खेळी पाहून उपस्थितांनीही हसून दाद दिली.