
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेटच्या मैदानावर बॅट हातात घेऊन थेट फलंदाजी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काहींनी राजकारणाच्या मैदानावर शाब्दीक गोलंदाजी करणारा हा माणूस थेट क्रिकेटच्या मैदानावर पाहून आनंदही व्यक्त केला. निमित्त होते सीएम चषक स्पर्धेचं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी थेट बॅट हातात धरत फडणवीस यांनी गोलंदाजीचा आनंद घेतला.
दरम्यान, आमदार योगेश टिळेकर यांनी फलंदाज फडणवीसांना गोलंदाजी केली. टिळेकरांनी टाकलेले पहिले दोन बॉल हुकले. ते फलंदाज फडणवीसांच्या बॅटला लागलेच नाहीत. मग, टिळेकरांनी तिसरा बॉल एकदम फुलटॉस टाकला. टिळेकरांच्या फुलटॉस बॉलवर अचुक निशाणा साधत फडणवीस यांनी दमदार शॉट लगावला. विशेष म्हणजे सुरुवातीचे दोन बॉल फडणवीस यांनी उजव्या बाजूंनी खेळले. तिसरा फुलटॉस बॉल मात्र त्यांनी डाव्या बाजूला टोलवला. फडणवीसांची ही टोलेबाजी पाहून फडणवीस राजकारणही क्रिकेटप्रमाणेच मुरब्बपणे खेळतात. निर्णय घेताना फुल टॉस बॉल येण्याची वाट पाहतात. एकदा का फुल टॉस बॉल पट्ट्यात आला की, तो उजवीकडे निर्देश करत डावीकडे टोलवतात. त्यामुळे त्यांना धावाही मिळतात आणि गोलंदाजही (विरोधक) गोंधळून जातात अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली. (हेही वाचा, शिल्पकार राम सुतार: सरदार पटेल यांचा जगप्रसिद्ध पुतळा साकारणारा मराठी माणूस; एक यशोगाथा)
भारतीय जनता युवा मोर्चाकडून सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेतेची सुरुवात पुणे येथे गुरुवारी (१ नोव्हेंबर) करण्यात आली. ही स्पर्धा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनापर्यंत म्हणजेच १२ जानेवारी २०१९पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच, स्पर्धेनिमीत्त आयोजित केलेजाणारे सामने राज्यातील विविध गावांमध्ये होणार आहेत.