'नवाब मलिक यांचे आरोप निराधार, जप्त केलेल्या बनावट नोटांचे मूल्य 14.56 कोटी रुपये नसून सुमारे 10 लाख रुपये आहे'; Sameer Wankhede यांचे स्पष्टीकरण
Sameer Wankhede, Nawab Malik | (Photo Credit Twiiter)

महाराष्ट्राचे मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा फेरा थांबताना दिसत नाही. बुधवारी नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना काही गुन्हेगारांना सरकारी पदे दिल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना संरक्षण दिल्याचा आरोपही केला.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मलिक म्हणाले की, 'पाच वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला देशात नोटाबंदी झाली, देशात 2000 आणि 500 ​​च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या, मात्र महाराष्ट्रात वर्षभरात बनावट नोटांची एकही घटना घडली नाही. देवेंद्र यांच्यामुळेच बनावट नोटांचे काम सुरू होते.’ तसेच मलिक यांनी असाही आरोप केला की, 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली.

त्यावर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे समीर वानखेडे यांनी बुधवारी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या या आरोपाचे खंडन केले. वानखेडे म्हणाले की जप्त केलेल्या बनावट नोटांचे दर्शनी मूल्य 14.56 कोटी रुपये नसून सुमारे 10 लाख रुपये आहे. तसेच या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. वानखेडे यांनी असेही सांगितले की, डीआरआय अधिकार्‍यांनी हे प्रकरण ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे संपर्क साधला होता, परंतु नंतर त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे नवाब मलिक यांचे आरोप निराधार आहेत, असे वानखेडे म्हणाले आहेत.

दरम्यान, आपल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी आरोप केले की, देवेंद्र फडणवीस हे हजारो कोटींच्या खंडणीमध्ये गुंतले असून मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांना उच्च पदावर बसवले आहे. फडणवीस यांचे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी चांगले संबंध असल्याचा आरोप केला. (हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप)

नागपूरचा कुख्यात गुन्हेगार मुन्ना यादव याची देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. बांगलादेशींच्या अवैध स्थलांतरात सहभागी असलेल्या हैदर आझमची फडणवीस यांनी मौलाना आझाद वित्त महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती, असेही त्यांनी सांगितले.