Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) समर्थन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अर्थात या चर्चेला दुजोरा मिळाला नसला तरी शरद पवार विरोधी गटाने केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोगासमोर झालेल्या सुनावणीत आपल्याला 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा 42 वा आमदार कोण? या प्रश्न उपस्थित केला जातो आहे. काही राजकीय मंडळींच्या मते मलिक हेच या प्रश्नाचे उत्तर असावे. राजकीय वर्तुळात अशीही दबकी चर्चा सुरु आहे की, मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी अजित पवार यांनीच पडद्यामागून प्रयत्न केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह घड्याळ नेमके कोणाचे? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर काल (शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023) पासून सुनावणी सुरु झाली आहे. येत्या सोमवारी (9 ऑक्टोबर 2023) पुन्हा ही सुनावणी पुढे नियमीत केली जाणार आहे. या वेळी शरद पवार गट आपले म्हणने विस्ताराने मांडणार आहे. अभिषेक मनू सिंघवी हे पवार गटाची बाजू निवडणूक आयोग आणि कोर्टातही मांडत आहेत. दरम्यान, आयोगातील सुनावणी वेळी अजितदादा गटाने दावा केला की, त्यांना 42 आमदारांचा पाठिंबा आहे. आजवर त्यांना 41 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात होते. मग आयत्या वेळी एक आमदार वाढला कोठून आणि तो वाढीव 42 वा आमदार आहे तरी कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेल्या 41 आमदारांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यातील बहुतांश आमदार उघडपणे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यातील काहींनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच, ते जाहीर कार्यक्रमांतूनही त्यांच्यासोबत दिसतात. पण, आयोगासमोर आणखी एक आमदार वाढून सांगितल्याने शरद पवार गटातील कोणता आमदार दादांच्या गळाला लागला याबातब तर्कवितर्क सुरु आहेत.
दरम्यान, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमे यांच्यातून केल्या जाणाऱ्या दाव्याबद्दल अजित पवार गट आणि नवाब मलिक अशा दोघांकडूनही मौन बाळगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडूनही याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळासह पक्ष कार्यकर्त्यांनाही त्याच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. नवाब मलिक कोणाचे? दरम्यान, स्वत: मलिक यांनीच पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असे काही कार्यकर्त्यांना वाटते आहे.