नवरात्रोत्सवादरम्यान (Navaratri 2022) गरबा आणि दांडिया (Dandiya-Garba) कार्यक्रमात बिगर हिंदूंना सहभागी होऊ देऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (VHP) नागपुरात सोमवारी केली. ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतरच कार्यक्रमाला प्रवेश दिला जावा, असे परिषदेचे म्हणणे आहे. हिंदू संघटनेच्या विदर्भ युनिटने यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या दुर्गादेवीच्या नऊ दिवसांच्या उत्सवात पारंपरिक गरबा नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
विहिंपचे विदर्भ प्रदेश सचिव गोविंद शेंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विदर्भातील विविध संस्था आणि मंडळांकडून गरबा आणि दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जिथे मुली, महिला आणि कुटुंबे मोठ्या संख्येने सहभागी होतात. गरबा आणि दांडिया हे केवळ मनोरंजन नसून ती एक पूजा आहे. त्यामुळे या ठिकाणी इतर धर्माच्या लोकांना प्रवेश देऊ नये.
ते पुढे म्हणाले की, अशा ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी लोकांचे आधार कार्ड तपासले जावे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत. कारण अशा कार्यक्रमांच्यावेळी अनेक समाजकंटक उपस्थित असतात. अलीकडे लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गरबा, दांडिया कार्यक्रमातही अशी उदाहरणे पाहायला मिळत असल्याचा आरोप शेंडे यांनी केला. (हेही वाचा: Chinchpoklichi Aaibhavani 2022: चिंचपोकळीची आई भवानी चं डोळ्यात भरणारं रूप; इथे पहा पहिली झलक!)
उत्सवादरम्यान योग्य उपाययोजना करण्यासाठी विहिंपने मंडळे आणि कार्यक्रम आयोजकांशीही संपर्क साधला आहे. या वर्षी 26 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजेच आजपासून शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू झाला. 5 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर हा उत्सव संपेल. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये विशेष पूजा केल्याने माँ दुर्गेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.