मुंबई: 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान बँका राहणार बंद, 26 आणि 27 ला राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी जाणार संपावर
बँक (Photo Credits: Twitter)

राष्ट्रीयकृत बँकांच्या विलीनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहे. या कारणास्तव 26 आणि 27 ला बँकांचे सर्व व्यवहार ठप्प राहतील. तर 28 नोव्हेंबरला चौथा शनिवार आणि 29 ला रविवार आल्या कारणाने सलग 4 दिवस बँका बंद राहतील. यामुळे लोकांना समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून 26 सप्टेंबरच्या अगोदर सर्व आर्थिक व्यवहार करुन घ्यावे असा सल्ला बँकांनी दिला आहे.

लोकमत ने दिलेल्या बातमीनुसार, ब-याच बँकांचे (Banks) अधिकारी हे राष्ट्रीयकृत बँकांच्या (Nationalised Banks) विलीनीकरणाच्या विरोधात आहेत. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र केंद्र सरकारने या विषयी कोणतेही सकारात्मक पाऊल उचलल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त शुल्क वसुली बंद करावी, बँकांचे व्यवहार हे आठवड्यातून 5 दिवस असावे यांसारख्या अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. हेही वाचा- या महिन्यात सलग 4 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता; Bank Unions नी दिला संपाचा इशारा, वेळीच पूर्ण करून घ्या कामे

यात 26,27 असे संपाचे दोन दिवस आणि शनिवार, रविवार हे सुट्ट्यांचे दिवस असल्याने सलग 4 दिवस बँका बंद राहतील. तर 30 सप्टेंबरला बँकेच्या अर्धवार्षिक लेखा व्यवहारात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असतील. त्यामुळे 1 ऑक्टोबरलाच बँकांची कामे करावी लागतील. त्यात लगेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.

अधिका-यांनी सलग सुट्ट्यांचे नियोजन करुन 26 आणि 27 सप्टेंबरला जाणीवपुर्वक संप पुकारल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. तर अधिका-यांच्या या एकतर्फी निर्णयामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल असे सांगण्यात येत आहे.