या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशभरातील बँकांचा (Bank) दोन दिवसांचा संप (Strike) होऊ शकतो. बँक अधिकाऱ्यांच्या चार वेगवेगळ्या संघटनांनी (Unions) याबाबत भारतीय बँक असोसिएशनला (Indian Banks Association) इशारा दिला आहे. हा संप जर घडला तर याचा सर्वात जास्त त्रास सामान्य नागरीकांना होणार आहे, कारण यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात डिजिटल आणि मोबाइल बँकिंग सुविधांवरही परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारने घेतलेल्या बँक विलीनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध तसेच इतर मागण्यांबाबत या सर्व युनियन उभा ठाकल्या आहेत.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स अशा चार संघटना, 26 सप्टेंबरची मध्यरात्र ते 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपावर जाण्याची शक्यता आहे. तसेच जर युनियनच्या गोष्टी सरकारने मान्य केल्या नाहीत तर, नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही बँक संघटनांकडून देण्यात आला आहे.
26 व 27 सप्टेंबर म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवारी हा संप होण्याच्या शक्यता आहेत. त्यानंतर महिन्यातील 4 था शनिवार येत असल्याने बँका बंद असणार आहेत व पुढे रविवार. अशा प्रकारे बँका 4 दिवस बंद राहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे तुमची जर का काही बँकेची कामे असतील तर ती 26 सप्टेंबरच्या आधीच पूर्ण करून घ्या. (हेही वाचा: सार्वजनिक क्षेत्रातील 10 मोठ्या बँकांचे विलीनीकरण; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा, पहा बँकांची यादी)
विलीनीकरणाला विरोध करण्याव्यतिरिक्त बँक संघटनांनी सरकारकडे आठवड्यातून सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा कार्यदिवस करावा अशी मागणी केली आहे. याशिवाय रोख व्यवहारासाठीची वेळ कमी करणे, आरबीआयच्या नियमांनुसार निवृत्तीवेतन, बँकांमध्ये भरती, एनपीएस रद्द करणे, ग्राहकांसाठी सेवा शुल्कामध्ये कपात, वेतन व पगार बदल इ. अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.