डोंबिवली (Dombivali) येथील तब्बल 50 उद्योगांना राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) जोरदार दणका दिला आहे. या 50 उद्योगांना प्रत्येकी तब्बल 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड या सर्व कंपन्यांना अवघ्या 7 दिवसांमध्ये प्रदूषणनियंत्रण मंडळ कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरणाची हानी केल्याबद्दल या सर्व कंपन्यांना (उद्योग) लवादाने कारवाई करत हा दणका दिला आहे.
प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या 50 उद्योगांना हरित लवादाने कारवाई करत दंड ठोठावला आहे त्यात रासायनिक अभियांत्रिकी व इतर उद्योगांचा समावेश आहे. हरित लवादाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.
डोंबिवली शहर आणि परिसरातील पर्यावरणाचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. गेल्याच काही दिवसांध्ये डोंबिवलीमधील नदीतील पात्रातून वाहणारे पाणी हे तांबड्या रंगाचे आणि विशिष्ट तवंग असलेले पाणी वाहात होते. विविध प्रसारमाध्यमांनी त्याबाबत वृत्तही दिले होते. दरम्यान, मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही डोंबिवीलीतील पर्यावरण प्रदुषणाची गंभीर दखल घेत प्रदुषण कमी करा, त्यावर उपाययोजना करा अन्यथा उद्योग बंद करा असा सज्जड दम उद्योजकांना भरला होता. (हेही वाचा, डोंबिवली: एमआयडीसी मध्ये रस्ते झाले गुलाबी, डोळे चुरचुरत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी)
डोंबिवली येथे असलेल्या काही रासायनिक कंपन्या या अत्यंत निष्काळजीपणा करत आहेत. ज्यामुळे पर्यावरणाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळेच कारवाई म्हणून हरित लवादाने हा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, लवादाच्या या कारवाईविरोधात कामा या उद्योजकांच्या संघटनेने न्यायालयात दाद मागितली आहे. दरम्यान, उद्योजकांनी वकिलांचा सल्ला घेतला असता, वकिलांनी उद्योजकांना लवादाच्या रकमेच्या एक टक्का म्हणजेच केवळ 25 हजार रुपये इतकी रक्कम प्रदूषण नियंक्षत्रण मंडळात जमा करण्याचा सल्ला दिला आहे.