Nashik Firecrackers Ban: उत्तर महाराष्ट्रात फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार;  फटाके विक्री बंदीचा निर्णय मागे
Firecrackers | Photo Credits: Pixabay

कोरोनाची परिस्थिती आता हळूहळू निवळत असल्याने लोकांची निर्बंधामधून सुटका झाली आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त वातावरणामध्ये दिवाळी (Diwali) साजरी होण्याची तयारी सुरू झाली आहे. काल नाशिक सह उत्तर महाराष्ट्रामध्ये फटाके विक्री बंदीचा निर्णय झाला होता पण  मीडीया रिपोर्ट्स नुसार आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशामध्ये दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ योजने अंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती. पण समाजातील, विक्रेत्यांची नाराजी पाहता हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. नक्की वाचा: Diwali 2021: यंदा दिवाळीत फटाके महागणार; किंमती 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता.

मागील वर्षी कोविड 19 नियमांमुळे नाशिक मध्ये 10 नोव्हेंबर 2020च्या मध्यरात्रीपासून फटाके फोडण्यात बंदी घालण्यात आली होती. फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश होते. राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही घोंघावत आहे. त्यासोबतीने येणारा हिवाळा ऋतू कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दिवाळीत फटाके फोडल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचं सांगत फटाके बंदी घालण्यात आली होती.

नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. गमे यांच्या निर्णयाचा मनसे कडूनही निषेध करण्यात आला.  नगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून त्यांनी निषेध केला.