Photo Credit- X

Nandurbar Violence: रिक्षा आणि मोटारसायकलमध्ये धडक (Rickshaws bike Accident) झाल्यानंतर किरकोळ अपघातानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांमध्ये दगडफेक (Stone Pelting) आणि जाळपोळीची घटना घडली. त्यामुळे परिसरात अशांतता निर्माण झाली. रविवारी रात्री उशिरा १०च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाल्याची घटना घडली नाही. पोलिसांनी संशयित आरोपीची ओळख पटवली आहे. (हेही वाचा: Bomb Threat in Dharavi: धारावीत बॉम्ब ठेवल्याचा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन; कॉलरच्या शोधासाठी तपास सुरू)

दगडफेक आणि जाळपोळीची घटना

घटनेची माहिती मिळताच, नंदुरबार शहर पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, नंदुरबार शहरातील त्रिकोणी इमारत, हलवाई मोहल्ला आणि चिराग गल्ली भागात रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान वाद वाढला. दगडफेकीदरम्यान काही दुकानांचे नुकसान झाले, एका दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जमावाला पांगविण्यासाठी आणि कायगा सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तणाव कमी झाला असला तरी, भागात अस्वस्थ शांतता आहे. पोलिसांनी अनेक व्यक्तींना ताब्यात घेतले आहे आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या इतरांचा सक्रियपणे शोध घेत आहेत.

नंदुरबार हिंसाचार

या घटनेनंतर पोलिसांनी रहिवाशांना शांत राहण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांना कायदा हातात घेऊ नये आणि हिंसाचाराच्या कोणत्याही घटनांची त्वरित पोलिसांना तक्रार करण्याचे आवाहन केले. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावित भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.