प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

गुरुवारी सकाळी नालासोपारा (Nalasopara) तुळींज पोलिस स्टेशनमध्ये (Tulinj Police Station) एका हेडकॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळ्या झाडून या हवालदाराने आपले जीवन संपवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 च्या सुमारास कॉन्स्टेबल सखाराम भोये (वय 42) यांनी त्यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरने स्वत:वर गोळ्या झाडल्या. भोये यांनी हे टोकाचे पाऊल नक्की का उचलले यामागील कारण शोधले जात आहे. महत्वाचे म्हणजे पोलीस स्थानकामध्ये ही घटना घडल्याने पोलीस दलालाही मोठा धक्का बसला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी भोये यांच्या सहकाऱ्यांनी बंदुकीचा आवाज ऐकला त्यानंतर आवाजाच्या दिशेन धाव घेतली असता घडल्या प्रकारामुळे झालेल्या दुखापतीसह जमिनीवर पडलेले भोये त्यांना आढळले. त्यानंतर सखाराम यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस ठाण्यात आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

भोये हे गेल्या चार वर्षांपासून तुळींज पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी नक्की का आत्महत्या केली याबाबत आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे. महत्वाचे म्हणजे बुधवारी, नव्याने तयार झालेल्या मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) आयुक्तालयाच्या वतीने, पोलिसांसाठी वसईमध्ये कामाचा ताण कसा हाताळावा याबाबत चर्चासत्र आयोजित केले गेले होते. (हेही वाचा: पटना: 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' माजी पोलिस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहले...)

दरम्यान याआधी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी एका उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. एजन्सीच्या म्हणण्यानुसार एसआयने पोलिस स्टेशनमधील त्यांच्या निवासस्थानी सर्व्हिस रिवॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून सहकारी जेव्हा त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्याना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.