अतिरिक्त वीज बिलामुळे मुंबईकरांची झोप उडाली, ग्राहकांनी ट्विटरवर व्यक्त केला संताप; mahadiscom.in वर असे तपासा वीज बिल
Representational Image (Photo credits: PTI)

कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) मुंबईकर आधीपासूनच त्रस्त आहेत. त्यामध्ये आता महावितरण कडून आलेल्या अतिरिक्त विजेच्या बिलामुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) मधील बहुतांश रहिवाशांनी अतिरिक्त आलेल्या विज बिलामुळे तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी काही रहिवाशांनी आपल्या बिलाचे फोटो ट्विटरवर टाकत संताप व्यक्त केला आहे. ज्या रहिवाशांना अंदाजे 4000 रुपये बिल येत होतं. अशा रहिवाशांना जून महिन्यात 20000 रुपयांचे बिल मिळाले आहे.

काही रहिवाशांनी विजेचे बिल हे नेहमीपेक्षा तीनपट अधिक असल्याची तक्रार दाखल केली आहे. नवी मुंबईतील पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोळी या भागातील रहिवाशांनी महाराष्ट्र विद्युत वितरण यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोट्नुसार, खारघर सेक्टर 10 मधील ज्या रहिवाशांना 8 ते 9 हजार रुपये महिना बिल येत होते. अशा रहिवाशांना 31 हजार पर्यंतचे बिल पाठवण्यात आले आहे. अनेक रहिवाशांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांना टॅग करत आपल्या बिलाचे फोटोज ट्विटरवर अपलोड केले आहेत.

ग्राहकांनी केलेले अतिरक्त विद्युत बिलासंबंधित ट्विट्स:

विजेचे बिल व्हेरिफाय कसे कराल?

# तुमचे विजेचे बिल महाराष्ट्र विद्युत वितरणाच्या अधिकृत वेबसाईट mahadiscom.in वर जावून चेक करु शकता.

# खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला तुमचा consumer number टाकायचा आहे.

# त्यानंतर Get consumer Details वर क्लिक करुन तुम्ही तुमचे बिल तपासू शकता.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाकडून यासंबंधित स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये कंपनीने लिहिले, "सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या मेसेजला बळी न पडता ग्राहाकांनी आपले विद्युत बिल तपासून घ्यावे. तसंच मागील वर्षी उन्हाळ्यात केलेल्या विजेचा वापर आणि यंदा लॉकडाऊनमुळे 24 तास घरात राहून केलेला विजेचा वापर यांची तुलना केली तर यंदाच्या वर्षी विजेचा अधिक वापर झाला आहे, हे तुमच्या ध्यानात येईल."

रिपोर्ट्सनुसार, तक्रार दाखल केलेले ग्राहक हे MSEDCL च्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई विभागातील आहेत. अतिरिक्त बिल पाठवणाऱ्या विद्युत कंपन्यांमध्ये MSEDCL सोबत अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांचाही समावेश आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईकरांना पाठवलेल्या अतिरिक्त विज बिलाबद्दल पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्युत कंपन्यांनी वाढीव रक्कम लावून ग्राहकांना अतिरिक्त विज बिल पाठवले असल्याचे म्हटले आहे.