मुंबईचा राजा: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा वर्गणी न घेण्याचा निर्णय
मुंबईचा राजा | लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ | (Photo Credits: Facebook)

भारतभर परसलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाने आपले जीवनमान बदलून टाकले आहे. गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊनच्या स्थितीत आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय यांच्यासह उत्पन्नाची विविध साधने बंद आहेत. त्यामुळे निश्चितच सर्वांचे आर्थिक गणित बिघडले आहे. महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्राची राजधानी मुंबई अग्रस्थानी आहे. यामुळे सदासर्वकाळ सुरु राहणारी मुंबई प्रथमच ठप्प झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध गणेशउत्सव मंडळ मुंबईचा राजा तर्फे विशेष निर्णय घेण्यात आला आहे. यंदा लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी घेण्यात येणार नाही. (मुंबई: लालबाग मधील गणेश गल्ली परिसर 'Containment Area' म्हणून BMC ने केला घोषित)

फेसबुक पोस्ट करत मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे. "कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत विभागीय वर्गणीदारांवर गणेशोत्सवाचा आर्थिक बोजा न टाकता यंदाच्या गणेशोत्सवात वर्गणीदारांकडून वर्गणी न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईच्या राजा तर्फे घेण्यात आला आहे," असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसंच "घरीच रहा, सुरक्षित रहा..." असा संदेशही देण्यात आला आहे.

पहा पोस्ट:

 

गुढीपाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, अक्षय्य तृतीया सर्वच सणांवर यंदा कोरोना व्हायरसचे सावट होते. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावरही काही बंधनं येऊ शकतात. गणेशोत्सव ही महाराष्ट्राची शान आहे. त्यातील मुंबईतील गणेशोत्सव अत्यंत प्रसिद्ध असून महाराष्ट्राबाहेरुनही भाविक या मंडळांना भेट देतात. तसंच भरभरुन दानही करतात. परंतु, सध्याच्या गंभीर परिस्थितीत वर्गणी न घेण्याचा मंडळाचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.