Online Fraud | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

एका सायबर घोटाळेबाजाने (Cyber Fraudster) भारतीय लष्कराचे बनावट ओळखपत्र (Indian Army Fake Identity Card), बनावट आधार कार्ड बनवले आणि अगदी लष्कराचा गणवेश परिधान करून मुंबईतील एका महिलेला तिचे अपार्टमेंट भाड्याने घेण्यापूर्वी आर्मी प्रोटोकॉलचा भाग म्हणून 3.68 लाख रुपये हस्तांतरित करायला लावले. 18 ऑक्टोबर रोजी अंधेरी पोलिस ठाण्यात (Andheri Police Station) एफआयआर दाखल करण्यात आला होता. अंधेरी येथे राहणाऱ्या 33 वर्षीय तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले की, ती घरून भागीदारीत ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत आहे. 7 ऑक्टोबर रोजी तिने दक्षिण मुंबईतील फ्लॅट भाड्याने देण्यासाठी काही प्रॉपर्टी वेबसाइटवर जाहिरात पोस्ट केली होती.

14 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीनारायण म्हणून भासवून फसवणूक करणाऱ्याने तिला फोन करून स्वारस्य दाखवले. त्याने तिला सांगितले की तो पुण्यातील भारतीय सैन्यात अधिकारी आहे आणि तिला अपार्टमेंटचे फोटो शेअर करण्यास सांगितले. जेणेकरुन तो त्याच्या कुटुंबाला दाखवू शकेल. काही वेळाने त्यांनी परत फोन करून फ्लॅट भाड्याने घेण्यास तयार असल्याचे सांगितले. हेही वाचा Hidden Camera In Oyo Hotel: ओयो हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग; पोलिसांकडून टोळीला अटक

त्याने असेही सांगितले की तो लवकरच आंध्र प्रदेशात जात आहे आणि त्याला तातडीने आपल्या कुटुंबाला मुंबईत हलवायचे आहे. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने भारतीय लष्कराचे ओळखपत्र, आधार कार्ड आणि आर्मी कॅन्टीन कार्डची छायाचित्रे पाठवली. 15 ऑक्टोबर रोजी फसवणूक करणार्‍याने प्रथम गुड मॉर्निंगचा संदेश पाठवला आणि नंतर तक्रारदाराला फोन केला. फ्लॅट बुक करण्यासाठी टोकन रक्कम पाठवत असल्याचे सांगितले.

तथापि, तक्रारदाराच्या पतीने यावर आक्षेप घेतला आणि सांगितले की त्याने त्याला वैयक्तिकरित्या पाहिले नाही. त्याची ओळख पडताळून पाहण्यासाठी व्हिडिओ कॉलवर बोलू इच्छितो. यासाठी आधीच तयार असलेल्या भामट्याने दुपारी दोन वाजता फोन करणार असल्याचे सांगितले. बरोबर 2 वाजता फोन केला. व्हिडिओ कॉलवर, फसवणूक करणारा हा लष्कराच्या कपड्यात होता. कॉल डिस्कनेक्ट करण्यापूर्वी 10 ते 12 सेकंद बोलला की तो लष्कराच्या आवारात आहे आणि त्याला व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी नाही.

फसवणूक करणार्‍याने या जोडप्याला सांगितले की आपण 28,000 रुपये पाठवले परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते जात नाही. त्यानंतर त्याने महिलेला लष्कराच्या प्रक्रियेचा भाग म्हणून काही पैसे पाठवण्यास सांगितले आणि दुप्पट रक्कम परत मिळेल असे सांगितले. अशा प्रकारे त्याने तिला एकूण 3.68 लाख रुपये देण्यास भाग पाडले. त्यानंतर या जोडप्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी अंधेरी पोलिसांकडे धाव घेतली.