
कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी हिजाब वाद प्रकरणी (Hijab Controversy) महत्वाचा निकाल दिला. हायकोर्टाने शैक्षिणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करणे अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे, तसेच विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाच्या आदेशानुसार गणवेश घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले. या वादाचे परिणाम विविध मार्गांनी देशभरात दिसून येत आहेत. मुंबईच्या लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करणाऱ्यांना डब्यांमधील गर्दी आणि त्यात सीट मिळवण्यात होणारी अडचण याची जाणीव असेल. परंतु आता हिजाब परिधान केल्याने मुंबईच्या लोकलमध्ये एका महिलेला बसायला जागी दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईच्या लोकलमध्ये नेहमीच जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरु असते. अनेकवेळा 3 जणांच्या सीटवर चौथ्या व्यक्तीलाही जागा दिली जाते. परंतु आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामधून निदर्शनास आले आहे की, एका महिलेला हिजाब परिधान केल्याने लोकलमध्ये सीट नाकारली गेली. ट्विटरवर डॉ परवेझ मांडवीवाला यांनी त्यांच्या पत्नीला मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना झालेल्या गैरसोयीबद्दल माहिती दिली आहे.
I understand that some people in the comment section are finding it hard to believe that this incident actually happened. They are saying its fake because it is indeed hard to digest that such a thing could happen in Mumbai. I and my wife are equally shocked and disgusted.
— Dr Parvez Mandviwala (@DrParvezM) March 16, 2022
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या पत्नीला आज लोकल ट्रेनमध्ये बसण्यास नकार देण्यात आला कारण तिने हिजाब घातला होता. माझ्या पत्नीच्या कडेवर लहान मुल होते, त्यामुळे एका गृहस्थाने तिच्यासाठी आपली सीट रिकामी केली, परंतु इतर प्रवाशांनी साडी नेसलेल्या महिलेला सीट देण्याचा आग्रह केला. हे कुठे संपणार?’
ते पुढे म्हणतात, ‘अनेक लोकांना कदाचित अशी घटना मुंबईसारख्या शहर घडू शकते यावर विश्वास बसणार नाही. हे पचायला अवघड आहे, परंतु मला आणि माझ्या पत्नीलाही तितकाच धक्का बसला आहे.’ (हेही वाचा: Sanjay Raut On PM: नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की पक्षाचे ? संजय राऊतांचा सवाल, राज्यपालांवरही केली टीका)
ही घटना मंगळवारी घडली. डॉ. परवेझ हे मीरा रोडचे रहिवासी असून ते व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना ते म्हणाले, ’ही बाब माझी पत्नी किंवा माझ्या कुटुंबाबद्दल नाही, तर एक समाज म्हणून आपण नक्की कुठे जात आहोत, ज्या वातावरणाकडे आपली वाटचाल सुरु आहे त्याबद्दल माझी चिंता आहे. अशा इस्लामोफोबिक गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आम्हाला एकमेकांशी सकारात्मक संवाद साधण्याची गरज आहे.’