Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकमधून प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी लावून धरली होती. या मागणीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली आहे. यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होईल. तसेच पुढील शिक्षणासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होईल.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या कामाशी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतच्या माझ्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे मनःपूर्वक आभार. यासर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 'लेव्हल 2' पास एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील, अशा आशयाचे ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. हे देखील वाचा- हिरानंदानी इस्टेट सोसायटी लसीकरण प्रकरणी BMC ने तपास करुन 15 दिवसांमध्ये रिपोर्ट तयार करावा- महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट-

इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता.