मुंबई: चोर समजून पालघर येथे 3 जणांची जमावाकडून हत्या
Murder | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

तिन अज्ञात नागरिकांची चोर (Thief) समजून हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर (Palghar) जिल्ह्यात घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. कासा पोलीस स्टेशन प्रमुख आनंदराव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10 वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेबाबत माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. शुक्रवारी पाहटेच्या सुमारास 3 अज्ञातांचे मृतदेह पोलिसांना मिळाले. जमावाने हत्या केलेल्या तिघांची ओळख अद्याप पटली नाही. हे तिघेही मुंबई (Mumbai) येथून एका कारने प्रवास करत होते. हे तिघे जण आपल्या कारने गडचिंचनळे गावाजवळील दाभाडी-खानवेल रस्त्यावर आले. दरम्यान, जमावाने त्यांना आढवले आणि त्यांची हत्या केली.

चोर असल्याच्या संशयावरुन जमावाने या तिघांची हत्या केली. या तिघांना कारमधून फरफटत बाहेर काढण्यात आले. त्यांना काठी आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. यात त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह घटनास्थळी सोडून जमाव निघून गेला. काही वेळातच पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तीनही इसमांची शरीरं रक्तबंभाळ अवस्थेत पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यत घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. (हेही वाचा,Coronavirus: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून 218 गुन्हे दाखल )

आनंदराव काळे यांनी सांगितले की, या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सशस्त्र दंगा, लॉकडाऊन उल्लंघन आणि हत्या असे आरोप आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. अद्याप कोणालाही अटक झाली नाही. प्रकरणाचा तपास सुरु आहे. कोविड 19 संकटामुळे राज्यभर लॉकडाऊन असतानाच्या काळात ही घटना घडली आहे.