
नुकतेच परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकार मुंबईसह संपूर्ण मुंबई (Mumbai) महानगर प्रदेशात रिक्षा (Auto Rickshaw) आणि टॅक्सी (Taxi) भाडेवाढ करत आहे. गेली पाच वर्षे भाडेवाढ झाली नसल्याने ती आता केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांवर अधिकच आर्थिक बोजा पडून, रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचेही नुकसान होणार आहे. म्हणूनच ही भाडेवाढ 1 मार्चऐवजी सहा महिने पुढे ढकलली जावी अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतने केली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, किमान तीन रुपयांनी ही दरवाढ असणार आहे. या निर्णयामुळे आधी रिक्षाचे किमान भाडे 18 रुपये होते ते आता 21 रुपये झाले आहे. तर टॅक्सीचे किमान भाडे 22 रुपये होते ते आता 25 रुपये झाले आहे. त्यानंतर पुढील दर किलोमीटरमागे ऑटोरिक्षाच्या भाड्यात 2.1 रुपये आणि टॅक्सीच्या भाड्यात 2.9 रुपये वाढ करण्याचे सुचवले आहे. ही नवीन भाडेवाढ 1 मार्चपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता ही भाडेवाढ तूर्ततरी थांबवावी अशी मागणी होत आहे. ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी भाडेवाढीच्या कार्यवाहीसाठी इतर दोन पर्यायही सरकार समोर ठेवले आहेत.
दुसरा पर्याय म्हणजे, ही भाडेवाढ टप्प्या टप्प्याने करावी. सध्या 1 मार्चपासून पुढील एका वर्षासाठी मूळ भाड्यात 1 रुपया व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 74 पैसे वाढ करावी. त्यानंतर उर्वरित भाडेवाढ ही एक वर्षानंतर करावी.
तिसरा पर्याय म्हणजे, सध्या सरसकट मूळ भाड्यात 2 रुपये वाढ करावी आणि मूळ भाड्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठीची वाढ वर्षभरासाठी स्थगित करावी. (हेही वाचा: Indian Railways Hikes Fare: रेल्वे प्रवाशांच्या खिशावरचा भार वाढला, पाहा किती वाढले तिकीट दर)
कोरोनाच्या काळात अनेकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेले आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. सध्या कुठे गाडी रुळावर येत असताना सरकारने ही भाडेवाढ अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा मिळण्याऐवजी ग्राहकांची संख्या रोडावेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.