
Mumbai Shocker: मुंबईतीस मानखुर्द येथील रहिवासी वसाहत असलेल्या लल्लूभाई कंपाऊंडमध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका दिवसाच्या बाळाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री सार्वजनिक कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकणाऱ्या एका वाटसरूच्या शेजारी एक लहानसा मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली. शरीराची नाळ अगदी पोटाशी जोडलेली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. अवघ्या एक दिवसांच्या बाळाचा मृतदेह आढळल्याने परिसरात बोंबाबोम झाली आहे.
स्थानिकांनी या घटनेची मानखुर्द पोलिसांना तत्काळ माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवार आणि शुक्रवारी किती महिलांनी बाळंतपणा केला हे तपासण्यासाठी पोलिस अधिकारी जवळच्या हॉस्पिटल्स आणि नर्सिंगकडे जात आहेत. पोलिसांनी या घटनेची चौकशीसाठी कंबर कसली आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा मृतदेह एका मुलीचा होता. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 315 (मुलाचा जिवंत जन्म होऊ नये किंवा त्याचा मृत्यू होऊ नये या हेतूने केलेले कृत्य) आणि 318 (मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवून ठेवणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात माहिती पुढे करू असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .