Mumbai Rain: मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो!
Powai lake (Photo Credit: ANI)

मुंबईत (Mumbai) सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Incessant Rainfall) बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव (Powai Lake) आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास ओसांडून वाहू लागला आहे. 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे माणसांना पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी ते वापरले जाते. गेल्या तीन दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन 1890 मध्ये पूर्ण झाले होते. त्यावेळी या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 12.59 लाख रुपये एवढा खर्च आला होता.

मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत मागील 24 तासांत 200 मिमी पावासाची नोंद झाली आहे. पुढील तीन तास मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. हे देखील वाचा- Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे कुलाबा येथील सखल भागात पाणी साचल्याने मच्छिमारांची स्थानिक प्रशासनाकडे मदतीसाठी मागणी

एएनआयचे ट्वीट-

चक्रवाती वर्तुळाकार स्थितीची तीव्रता आज कमी होणार असली तरी राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि उर्वरीत मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो, अशीही माहिती समोर आली आहे.