कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी एक खास मागणी केली आहे. या कोरोना विरुद्धच्या लढ्यात मृत्यू झालेल्या पोलिसांना शहीद म्हणून संबोधले जावे असे आयुक्त सिंह यांचे म्हणणे आहे. यानुसार कर्मचार्यांच्या बलिदानाला सन्मान मिळाल्याची भावना निर्माण होईल तसेच अन्य कर्मचाऱ्यांना या लढ्यात एक मनोबल मिळेल असा हेतू आहे असेही सिंह यांनी स्पष्ट केले. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सुद्धा या मागणी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आज नाही तर उद्या त्यांना शहीद म्हणून संबोधले जाईलच तसेच पोलिसांसह वैद्यकीय क्षेत्रातील मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा असेच संबोधले जावे असा सुद्धा विचार आहे असे देशमुख यांनी म्हंटले आहे. टाइम्स च्या वृत्ताच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील 31 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 50 लाख रुपयांची मदत देण्याचे मागेच सांगण्यात आले होते, यासोबतच पोलीस केअर स्पेशल फंड मधून सुद्धा या मृत पोलिसांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयाची मदत आणि पोलीस दलात नोकरी सुद्धा देण्याची आश्वासन देण्यात आले होते. या मदतीच्या सोबतच त्या मृत पोलिसांच्या बलिदानाला ओळख मिळवून देण्यासाठी त्यांना शहीद म्हणून संबोधले जावे असे सांगण्यात येतेय.
दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही. सध्या नियमानुसार युद्ध किंवा नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलिसांना शहीद म्हणून संबोधले जाण्याची तरतूद आहे. त्यात बदल करून येत्या काळात आता कोरोनमुळे जीव गमावलेल्या पोलिसांच्या सन्मानासाठी त्यांना साईड म्हंटले जाणार का हे पाहणे महत्वाचे आहे.