Mumbai Police| Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबई पोलिस (Mumbai Police) आपल्या सेवेत कुठेही कमी पडत नाहीत, याची अनेक उदाहरणे आपण यापूर्वी पाहिली किंवा ऐकली असतील. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत आत्महत्या करणाऱ्या कित्येकांचे प्राण वाचवले आहेत. मंगळवारी अक्सा बीचवर (Aksa Beach) आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा मुंबई पोलिसांनी जीव वाचवला आहे. अक्सा बीचवर 23 वर्षीय तरुणी समुद्रात उडी मारून आपलं जीवन संपवण्याच्या प्रयत्नात होती. परंतु, सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी या तरुणीला समुद्राच्या पाण्यातून ताब्यात घेतलं आणि तिचा जीव वाचवला.

या घटनेनंतर तरुणीचा जीव वाचवणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना प्राची शाह नावाची 23 वर्षीय तरुणी अक्सा बीचवर आत्महत्या करण्यास जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हिंडे यांनी यासंदर्भात तात्काळ मालवणी पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रजाने आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना एक महिला समुद्रात कंबरेऐवढ्या पाण्यात जात असल्याचं दिसलं. त्यानंतर महिला अधिकारी कदम यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन तरुणीला ताब्यात घेतलं. (वाचा - Dhule: फेसबुक लाईव्ह करून धुळ्यातील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने वाचले प्राण)

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करत धुळ्यातील एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रकार लक्षात आल्यानंतर आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून या तरुणाचा जीव वाचवण्यात आला होता. यात मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

धुळ्यातील या तरुणाने रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमार फेसबुक लाईव्ह सुरू करून आपल्या मनगटाची नस कापली. मात्र, पोलिसांनी या तरुणाचे लोकेशन शोधून काढत त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. महाराष्ट्र पोलिसांच्या तत्परतेमुळे या तरुणाचे प्राण वाचवण्यात आले.