मुंबई: Remdesivir चा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक; 272 इंजेक्शन्स जप्त
Remdesivir (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) वेगाने पसरत असून राज्यात  रेमडेसिवीरचा (Remdesivir) तुडवटा निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीत रेमडेसिवीरचा काळाबाजार उघडकीस आला आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने (Mumbai Police Crime Branch) अटक केली आहे. त्याच्याकडून 272 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. (मुंबईमध्ये Remdesivir चा काळाबाजार, 40 ते 50 पट जास्त किंमतीने विकली जात आहेत औषधे; मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे कडक कारवाई करण्याचे आदेश)

अंधेरी, जोगेश्वरी परिसरात रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि छापेमारीत रेमडेसिवीरची 272 इंजेक्शन्स जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसंच हे इंजेक्शन कोठून आणलं, कोणाला विकणार या संबंधित अधिक तपास केला जात आहे.

ANI Tweet:

या इंजेक्शनची किंमत 1200 रुपये असून काळाबाजार करणारे 5500 ते 6000 रुपयांना हे इंजेक्शन विकत आहेत. कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना बरे होण्यासाठी रेमडेसिवीर दिले जाते. कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटात रेमडेसिवीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर वाढला.

दरम्यान, रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारही पाऊल उचलत आहे. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिवीर उत्पादकांसोबत बैठक घेतली. त्यात त्यांनी काळाबाजार रोखण्यासाठी काही विशेष सूचना उत्पादकांना केल्या आहेत.