मुंबई पोलिसांच्या आदेशावरुन मनसे ने वळविला 9 फेब्रुवारीचा मोर्चा; 'हा' असेल नवा मार्ग
Raj Thackeray (Photo Credits: PTI/File)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 23 जानेवारीला राज्यव्यापी अधिवेशनात 9 फेब्रुवारीला होणा-या मोर्च्याची घोषणा केली आणि सर्व कार्यकर्ते या मोर्च्याच्या तयारीला लागले. हा मोर्चा जरी त्याच तारखेला होत असला तरीही या मोर्च्याच्या मार्गात थोडा बदल करण्यात आला आहे. ज्यात हा मोर्चा गिरगाव चौपाटीपासून निघेल. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता (MNS March Route). मात्र, मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचं सांगण्यात येत आहे.

9 फेब्रुवारीला होणा-या मोर्च्यासाठी आम्हाला पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर हा मोर्चा काढण्यात येईल असे राज ठाकरे यांनी आधीच सांगितले होते. मनेसेच्या मोर्चाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावर स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती.

हेदेखील वाचा- राज ठाकरे म्हणतात 'मी मराठी आणि हिंदू सुद्धा'; मनसे येत्या 9 फेब्रुवारीस आझाद मैदानावर काढणार मोर्चा

CAA च्या समर्थनार्थ हा मोर्चा असल्याचे बोलले जात होते. मात्र अलीकडेच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिका-यांच्या बैठकीत जाऊन या शंकांचे निरसन केले आणि हा मोर्चा CAA च्या समर्थनार्थ नसून पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात असल्याचं नमूद केले.

देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केलं होतं.