MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: ANI)

MNS Adhiveshan 2020: एकाच वेळी मी मराठी आहे तसाच हिंदू सुद्धा आहे. मी धर्मांतर केले नाही. तसेच, मी माझा रंगही बदलला नाही. रंग बदलून सत्तेत गेलो नाही. त्यामुळे जर तुम्ही माझ्या भाषेला नख लावत असाल तर, मी मराठी म्हणून अंगावर जाईन. तुम्ही जर माझ्या धर्मावर याल तर मी तुम्हाला हिंदू म्हणून अंगावर घेईन, अशी मांडणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navanirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पक्षाच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना सूचक दिशादर्शन केले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात थेट हिंदूत्वाचा पुरस्कार केला नसला तरी, मनसे भविष्यात हिंदूत्वाच्या दिशेने पाऊल टाकू शकते, याचे संकेत जरुर दिले. याच वेळी ठाकरे यांनी भारतात आलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुस्लिमांना त्यांच्या देशात हाकला या आपल्या जुन्याच भूमिकेचा नव्याने पुनरुच्चार केला. तसेच, या मुस्लिमांना पुन्हा त्यांच्या देशात हाकलून देण्याच्या मुद्द्यावर येत्या 9 फेब्रुवारी या दिवशी मुंबई येथील आझाद मैदानात मनसे मोर्चा काढणार अशी घोषणाही केली.

उर्वरीत मुद्दे गुडीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार

मुंबईतील गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राज्यव्यापी महाअधिवेशन आज (23 जानेवारी) पार पडले. या अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते. या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. तसेच, उर्वरीत मुद्दे येत्या गुडीपाडव्याला मनसे कार्यकर्ता मेळाव्यात बोलणार असल्याचही सांगितले.

रंग बदलला म्हणून राज ठाकरे बदलणार नाही

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे ‘ जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी न करता ‘ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो’ अशी केली. ज्याला उपस्थिकांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मनसेने ट्रॅक बदलल्याचा नेमका संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचला. राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे त्याचा अर्थ राज ठाकरे बदलला असा होत नाही. मी तोच होतो जो पूर्वी आहे. माझी मतंही तीच आहेत जी पूर्वीपासून होती. रंग बदलून मी सरकारमध्ये जाणारा नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत शिवसेनेला टोला लगावला.

सोशल मीडिया काळजीपूर्वक वापरा

पक्ष संघनेत घेतले जाणारे कोणतेही निर्णय, माहिती अथवा संदेश वेड्यावाकड्या पद्धतीने सोशल मीडियावर येता कामा नये. चांगल्या गोष्टी जरुर सोशल मीडियावर टाका. परंतू, पक्षांतर्गत मतभेद अथवा इतर गोष्टी सोशल मीडियावर अजिबात येता कामा नये. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप जपून वापरा, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यर्त्यांना दिला. (हेही वाचा, प्रशासनाला सरकार बदलल्याची कल्पनाच नाही, विधिमंडळ दिनदर्शिकेवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र)

पदाचा मान राखा

पक्ष संघटनेत काम करताना अनेकदा पदावर काम करणारा नेता आणि कार्यकर्ता यांची वयं सारखी असतात. पण, असे असले तरी, त्या पदाचा मान सर्वांना राखावाच लागेल. काही मतभेद, तक्रार अथवा काही वेगळे मत असेल तर वरिष्ठ नेते आहेत. मी आहेत. त्यांना सांगात पण सोशल मीडियावर वेडेवाकेड लिखान अथवा वेगळा मार्ग खपवून घेतला जाणार नाही. तसे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीस पदावरुन थेट काढून टाकले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

एकाच वेळी दोन झेंडे (नियम व अटी लागू)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दोन झेंडे लॉन्च केले. यातील पहिला झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला झेंडा आहे. दुसरा आहे इंजिन हे निवडणुक चिन्ह असलेला. त्यापैकी राजमुद्रा असलेला झेंडा हा निवडणुकीत वापरायचा नाही. तसेच, तो इकडेतिकडे वेडावाकडा पडणार नाही, याची काळजी घ्या. तर, इंजिन असलेला झेंडा निवडणुकीत वापरा असे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

पाकिस्तानी, बांग्लादेशी मुसलमानांना भारतातून हाकला.

भाषा ही कोणत्याही धर्माची नसते ती प्रदेशाची असते.जर असे नसते तर बंगाली भाषेचा आग्रह धरत बांग्लादेशी नागरिकांनी बंगाली भाषेचा आग्रह का धरला असता, असा सवाल विचारतानाच केवळ अडीच हजार रुपयांत बांग्लादेशी नागरिक भारतात येतात. उद्या जेव्हा काही घडेल तेव्हा भारताच्या सैनिकांना भारताबाहेर नव्हे भारतातच लढावे लागेल. खरे म्हणजे पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकायला हवे आहेत. पहिली ती समझोता एक्सप्रेस बससेवा बंद करायला हवी. पाकिस्तान आणि बांग्लादेशी मुस्लिम भारतातून हाकलून दिले पाहिजेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, माणूसघाणा व्यक्ती नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली. मात्र त्यांनी जी चांगली गोष्ट केली त्यासाठी त्यांचं अभिनंदन करणाराही मीच होतो. अनुच्छेद ३७० चा विषय असो किंवा राम मंदिराचा विषय असो नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा मीच होतो, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. भारतातील बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम हाकलून लावण्यास मनसे राज्य आणि केंद्र सरकारला मदत करेन असेही राज ठाकरे म्हणाले.