महाराष्ट्रात (Maharashtra) कालच्या आकडेवारीनुसार 17,974 कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्ण असून, एकूण 694 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. राज्यात मुंबई (Mumbai) येथे सर्वाधिक म्हणजेच 11,394 रुग्ण आढळून आले आहेत व दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. अशात मुंबई महापालिका आयुक्त (BMC Commissioner) प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांची बदली झाली असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई मधील कोरोना विषाणूचा संसर्ग प्रकरण आटोक्यात आणण्यामध्ये अपयश आल्याने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
एएनआय ट्विट -
#Mumbai : Iqbal Singh Chahal appointed as the new commissioner of Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Pravin Pardeshi transferred to the Urban Development department as Additional Chief Secretary. pic.twitter.com/qIbWDEKqZj
— ANI (@ANI) May 8, 2020
प्रवीण परदेशी यांच्याजागी इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांची मुंबई मनपाचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली आहे. तसेच ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैसवाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई शहरात कोरोनाचे संकट वाढत आहे. लॉक डाऊनचे पालन होत असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असलेली दिसून येत आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी भर बैठकीत परदेशी आणि मेहता यांचे इतर अधिकाऱ्यांसमोर खटके उडाले होते. त्यानंतर परदेशी यांच्या कामाबाबत अनेक ठिकाणी नाराजीचा सूर उमटलेला दिसून आला होता. अखेर आज त्यांची बदली झाली. (हेही वाचा: पालघर तिहेरी हत्याकांड प्रकरणी जिल्ह्याचे एसपी गौरव सिंह सक्तीच्या रजेवर; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय)
प्रविण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र सध्याच्या संकटाच्या काळातील त्यांचे अनेक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव म्हणून बदली झाली आहे. त्या ठिकाणी मनोज सौनिक काम करत होते, जे आता वित्त विभागात अतिरिक्त सीएस असतील.