Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

चर्चगेट-बोरिवली ट्रेन (Churchgate Borivali) मध्ये मोटारमॅन केबिनमध्येच भोवळ येऊन कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार (31 जानेवारी) दिवशीची दुपारची ही घटना आहे. 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास गाडी मालाड स्थानकात आली तेव्हा मोटारमॅन मनिष कुमार भोवळ येऊन गाडीतच पडले. गार्डच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने आपत्कालीन उपचार मिळवून देण्यास मदत केली. दरम्यान यासाठी गाडी 12 मिनिटं रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आली.

मनिष कुमार हे रेल्वेमध्ये पूर्वी मालवाहतूकीच्या रेल्वेचे ड्रायव्हर होते. नंतर त्यांना प्रमोशन मिळाल्याने लोकल ट्रेनसाठी ट्रेनिंग देऊन त्यांना 24 जानेवारी दिवशी लोकल साठी नियुक्त करण्यात आले होते. मंगळवारी ते मोटारमॅनच्या केबिनमध्ये चीफ लोको इन्सपेक्टर सोबत काम करत होते. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास इन्सपेक्टरच्या देखरेखीखाली करत बोरिवली पर्यंतचा प्रवास केला. नंतर त्यांना मुंबई सेंट्रलला Jagjivanram Railway Hospital मध्ये दाखल करण्यात आले. रक्तदाब कमी झाल्याने मनिष यांना भोवळ आल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोको इन्सपेक्टरला देखील मोटारमॅन प्रमाणे लोकल ट्रेनवर नियंत्रण ठेवण्याचं पूर्ण प्रशिक्षण असतं. त्यामुळे हा प्रकार प्रवाशांच्या जीवासाठी धोका नव्हता.

रेल्वे प्रवासामध्ये मोटारमॅनला सिग्नल बाबतचे अलर्ट हे auxiliary warning systems द्वारा दिले जातात. पॅनल वर वेळोवेळी दिले जाणारे हे अपडेट्स पाहून पुढील निर्णय घेण्यासाठी मोटारमॅन कडे कमालीची दक्षता आवश्यक आहे. दर 4 सेकंदाने त्यासाठी मोटारमॅनला अपडेट्स पहावे लागतात. ते न पाहिल्यास ब्रेक आपोआप कार्यान्वित होतात. साधारण सिग्नलच्या 180 मीटरच्या अंतरावर आधीच त्याची माहिती दिली जाते.