Robbery | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Mumbai: एका अल्पवयीन मुलाने प्लॅस्टिकच्या बंदुकीचा वापर करून शहरातील एका दागिन्यांच्या दुकानात (Jewellery Shop) लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान, 16 वर्षीय मुलाने शेअर मार्केट (Share Market) मध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना दिली. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील 60 फूट रोडवरील शक्ती ज्वेलर्सच्या दुकानात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी दुकानात पोहोचला आणि त्याने ज्वेलर्सला सांगितले की, त्याला त्याच्याकडील काही सोन्याची बिस्किटे विकायची आहेत. दागिने व्यवस्थापनाने त्याच्याकडून खरेदी करण्यास नकार दिला आणि मुलाला निघून जाण्यास सांगितले. तो सुरुवातीला दुकानातून निघून गेला आणि काही मिनिटांनी हातात प्लास्टिकची बंदूक घेऊन परत आला. (हेही वाचा - Mumbai Fire: दहिसरच्या वैशाली नगर भागात भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video)

ही प्लॅस्टिकची बंदूक असल्याचे दुकानदाराला आधी समजले नाही. मुलाने बंदूकीचा धाक दाखवत दुकानात लूट केली. मात्र, दरोडा टाकून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना काही स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान त्याने शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी दरोड्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एसएससीचा विद्यार्थी आहे. चहाचे दुकान चालवणाऱ्या त्याच्या वडिलांचे डिमॅट खाते आहे, हे डिमॅट खाते हा मुलगा हाताळतो. त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळायचे. त्यामुळे अधिक श्रीमंत होण्यासाठी त्याला अधिक पैसे गुंतवायचे होते.

भाईंदर पोलिसांनी त्याच्याकडून प्लास्टिक बंदुक जप्त केली असून अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.