देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai) प्रवासाचा, रहदारीचा त्रास आता बराच कमी होणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने म्हटले आहे की, मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) दुसऱ्या टप्प्यातील लाइन 2A आणि लाइन 7 वर लवकरच काम सुरू होईल. 2A मार्ग गेल्या वर्षी एप्रिलमध्ये वाहतुकीसाठी अंशत: खुला करण्यात आला होता. मेट्रो लाइन 2A आणि 7 च्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्याला गुरुवारी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आणि आता 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो लाईनला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
एप्रिल 2022 पासून, मेट्रो मार्ग 2A आणि 7 अनुक्रमे दहिसर पूर्व आणि डहाणूकरवाडी आणि आरे दरम्यान अंशतः कार्यरत आहेत. आज मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मेट्रो 2A वरील डहाणूकरवाडी ते डी एन नगर आणि आरे ते अंधेरी पूर्व या मार्गाच्या विभागासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला प्रमाणपत्र जारी केले. एमएमआरडीएचे मेट्रोपॉलिटन कमिशनर एस व्ही आर श्रीनिवास यांनी पुष्टी केली की, ‘एमएमआरडीएला आज मेट्रो लाइन्सच्या व्यावसायिक ऑपरेशन्ससाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाची सेवा देण्यासाठी तयार आहोत.’
गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंदवली मेट्रो स्टेशनला भेट दिली, जिथे त्यांनी जाहीर केले की पंतप्रधान मोदी 19 जानेवारी रोजी दोन मेट्रो कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवतील. गुरुवारपासून हे मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर, पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच लिंक रोडवरील वाहनांची वर्दळ कमी होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही मेट्रो मार्गांमध्ये डी एन नगर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या विद्यमान मेट्रो लाइन 1 सह प्रत्येकी एक इंटरचेंज आहे.
मेट्रो मार्ग 7 आणि मेट्रो मार्ग 2 अ चा 35 किलोमीटर्सचा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील 33 स्थानके लोकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. हा टप्पा लोकांच्या सेवेत येण्याने अंधेरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील मुंबईकरांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल. मुंबई मेट्रो मार्ग 7 गुंदवली (अंधेरीपूर्व) ते दहिसर पूर्व कॉरिडॉर ही पश्चिम द्रुतगती मार्गालगत असून मुंबई मेट्रो मार्ग 7 मुळे मुंबईच्या पश्चिमेकडील भागांना पूर्वेकडील भागांशी जोडून सेवा देईल. मुंबई मेट्रो मार्ग 7 मुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-7 टप्पा-2 आणि टप्पा-2 या दोन टप्प्यात पूर्ण केली आहे.
मुंबई मेट्रो मार्ग 7-
मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा-1 ) हा 10.902 किमी लांबीचा उन्नत कॉरिडॉर आहे ज्यामध्ये 9 स्थानके आहेत (आरे ते दहिसर (पू)) ज्यामधे (दहिसर (पू) हे स्थानक मुंबई मेट्रो मार्ग 2अ अंतर्गत येते.
मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा-7) मध्ये ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, रे या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा-2) 5.552 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे ज्यामध्ये 4 स्थानके आहेत- गोरेगाव पूर्व, जोगेश्वरी पूर्व, मोगरा, गुंदवली.
मुंबई मेट्रो मार्ग 2 अ-
मुंबई मेट्रो मार्ग 2अ अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व कॉरिडॉर मुंबईच्या पश्चिमेकडील भागांसाठी अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2अ सुद्धा 2 टप्प्यात पूर्ण केला आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2अ (टप्पा-1) हा 9.828 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये 9 स्थानके आहेत (डहाणुकरवाडी ते दहिसर पूर्व). (हेही वाचा: दिलासादायक! लवकरच होणार 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; मानधनवाढीसह मिळणार नवीन मोबाईल व विमा संरक्षण)
मुंबई मेट्रो मार्ग 2 अ (टप्पा-2) मध्ये- दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली प., पहाडी एकसर, कांदिवली प., डहाणुकरवाडी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो मार्ग 2अ (टप्पा-2) हा 8.768 किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग आहे, ज्यामध्ये- वळनई, मालाड प., लोअर मालाड, पहाड़ी गोरेगाव, गोरेगाव प., ओशीवरा, लोअर ओशीवरा, अंधेरी प. या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.